भाजपच्या नोट जिहादमुळं तावडेंच्या आयुष्याचा विनोद झाला, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपच्या नोट जिहादमुळं तावडेंच्या आयुष्याचा विनोद झाला, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

भाजपच्या नोट जिहादमुळं तावडेंच्या आयुष्याचा विनोद झाला, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Nov 19, 2024 06:52 PM IST

Sushma Andhare on Devendra Fadnavis: भाजप नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

Maharashtra Assembly Election 2024: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) पैसे वाटत असल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे (BVA) नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) आणि आमदार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) यांनी केला. यानंतर विनोद तावडे यांनीही हे सर्व आरोप फेटाळून लावले असले तरी विरोधकांकडून भाजपसह (BJP) महायुती सरकारला (Mahayuti) कोडींत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

विनोद तावडे यांनी नालासोपाऱ्यात पैसे वाटप केल्याचा आरोप केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी एक ट्विट केले. 'भाजपच्या नोट जिहाद ने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला...! पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं...!! देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप..?' असे सुषमा अंधारे यांनी म्हटले. एवढेच नाहीतर, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद तावडे हे आज सकाळी विरार पूर्वच्या मनोरीपाडा परिसरातील विवांता हॉटेलमध्ये गेले होते. या मतदारसंघातील उमेदवारांची भेट घेण्यासाठी विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये गेल्याचे समजत आहे. मात्र, त्याचवेळी क्षितिज ठाकूर हे बहुजन विकास आघाडीच्या इतर कार्यकर्त्यांसह विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. यानंतर त्यांनी विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा त्यांनी आरोप केला.

विनोद तावडे काय म्हणाले?

विनोद तावडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. मी निवडणुकी संदर्भातील काही गोष्टी सांगण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांचा असा गैरसमज झाला की, मी तिथे पैसे वाटतो आहे. पण याप्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस तपास करीत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजही आहे. मी गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. जे सत्य आहे, ते समोर आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी माझी मागणी आहे, असे विनोद तावडे म्हणाले आहेत.

Whats_app_banner