Maharashtra Assembly Election 2024: महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होत आहे. दोन्ही पक्षांकडून विविध तर्कवितर्क लावले जात असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील ८ आमदार आणि दोन मंत्री आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. संपर्कात असलेल्या आमदार, खासदारांना बोलवून घ्या आणि सोडून गेलेली परत का आली नाहीत, याचे आत्मपरीक्षण करावे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी एका वृत्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदे गटातील ८ आमदार आणि दोन मंत्री आमच्या संपर्कात आहे, असा दावा केला होता. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, 'जी लोक तुमच्या संपर्कात आहेत, त्यांना बोलवून घ्या. माध्यमांसमोर दाखवा', असे श्रीकांत शिंदे म्हणाले. 'पण एवढी लोक सोडून गेली, का सोडून गेली ती आणि परत का आली नाहीत, याचे आत्मपरीक्षण करावे', असा सल्ला श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जात असताना शिंदे गटातील एका मोठ्या मंत्र्याचा मला फोन आला. या मंत्र्याने माझ्यासह ८ आमदार असून आम्ही मोठे बंड करणार असल्याची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागून परत येतो, असे मंत्र्याने सांगितले. परंतु, उद्धव ठाकरेंनी सोडून गेलेल्या कोणत्याही नेत्याला माफ करायचे नाही, असे स्पष्ट सांगितले आहे’, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मिलिंद देवरा यांना वरळी मतदारसंघातून तिकीट दिल्याने वरळी मतदारसंघातील लढत खूपच रंजक आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाने संदीप देशपांडे यांना तिकीट दिले आहे. यामुळे वरळी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात मुख्य लढत महाराविकास आघाडी आणि महायुती यांच्यात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.