Maharashtra Elections : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा, कसं आणि काय घडलं?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Elections : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा, कसं आणि काय घडलं?

Maharashtra Elections : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्या दोन गटांत तुफान राडा, कसं आणि काय घडलं?

Nov 15, 2024 11:37 AM IST

Shivajinagar Assembly Constituency : पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात गुरुवारी रात्री जोरदार राडा झाला आहे. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या सभेनंतर हा प्रकार घडला.

 शिवाजी नगर मतदारसंघात दोन गटात तुफान राडा
शिवाजी नगर मतदारसंघात दोन गटात तुफान राडा

Maharashtra assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा प्रचार जोमात सुरू आहे. अनेक ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये खटके उडत आहेत. मात्र, पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात भाजपच्याच दोन गटांत राडा झाला. यावेळी कोयते, तलवारी आणि बंदुकीनं एकमेकांना धमकावण्याचा प्रकार घडल्याचं समजतं. मात्र, या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारादरम्यान संगमवाडी इथं दोन गट आमनेसामने आले. संगमवाडी गावठाण इथं सिद्धार्थ शोरोळे यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही सभा संपल्यानंतर शिरोळे हे संगमवाडी येथील भाजपाचे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यावेळी साधारण साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला.

याची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी संगमवाडी इथं पोहोचले. संबंधित लोकांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र, या कार्यकर्त्यांनी आपसात बैठक होऊन हा वाद आपसात मिटवला आहे. पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. संगमवाडी गावात सध्या शांतता आहे, अशी माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली.

पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघ २०१४ पासून भारतीय जनता पक्षाकडं आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार असून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. २०१९ साली त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बहिरट पुन्हा एकदा उभे ठाकले आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी आता त्यांच्या सोबत आहे. तर, लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षित मतं मिळाली नव्हती. त्यामुळं यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन राजकीय आघाड्यांमध्ये जोरदार चुरस आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर