Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक राजकीय पक्षाचे विविध नेत्यांनी सध्या महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आज महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 'निवडणूक आयोग आज काहीतरी घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करावी. आम्ही तयार आहोत. लोकसभा निवडणुकीत आपण राजकीय शत्रूला पाणी पाजले. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या संरक्षणाची लढाई होती. मात्र, आता ही लढाई एक तर तू राहशील किंवा मी राहील, अशी असेल. परंतु, ही लढाई आपल्या मित्र पक्षात नको. जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत, त्यांच्याविरोधात लढू.'
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुती सरकारला आता जाग आली. आता पवित्र होण्यासाठी पाण्यात डुबक्या मारून पाहत आहेत. मग ते सगळीकडे स्वत:चे फोटो छापत आहेत. पण आपल्याला ही निवडणूक कशी लढायची आहे, हे आपण ठरवायचे आहे. आपल्यामध्ये काड्या घालणारे काही लोक महायुतीत बसलेले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचे चेहरा आहेत की आणखी कोण आहे? मी आता या ठिकाणी सांगतो, येथे शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील बसलेले आहेत. मी सांगतो मुख्यमंत्रिपदासाठी तुमच्यापैकी कोणाचाही चेहरा असेल तर तुम्ही जाहीर करा, आमचा तुम्हाला पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
केंद्रीय निवडणूक आयोग आज (१६ ऑगस्ट २०२४) दुपारी ३.०० वाजता वाजता विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पत्रकार परिषदेसाठी निवडणूक आयोगाकडून प्रसारमाध्यमांना देण्यात आलेल्या निमंत्रणात कोणत्या राज्यांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, याचा उल्लेख नव्हता.