Sharad Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर टीका केली. आर आर पाटील यांना त्यांच्या राजकीय कारकीर्दीत संपूर्ण सहकार्य करूनही त्यांनी माझा केसाने गळा कापला, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. अजित पवारांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना अजित पवार यांनी आरआर पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की,'एखादा व्यक्ती गेल्यानंतर नऊ वर्षांनी त्यांच्यासंदर्भात बोलणे चुकीचे आहे. आर आर पाटील यांची स्वच्छ राजकारणी म्हणून राज्यात नाहीतर, संपूर्ण देशात ओळख आहे. आर आर पाटील यांच्याबद्दल अनेस वक्तव्य करणे, चुकीचे आहे. परंतु,सत्तेत असले की, अशा शब्दांचा वापर केला जातो. कोणाबद्दल काहीही बोलले जाते', असे शरद पवार म्हणाले.
मला बदनाम करण्यासाठी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे करण्यात आले. पंरतु, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि इतर खर्च ४२ हजार कोटी इतका होता. मग ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा कसा होणार? परंतु, यामुळे माझी बदनामी झाली. पुढे, चौकशीसाठी फाईल तयार करण्यात आली. ही फाइल गृहखात्याकडे गेल्यानंतर आर.आर पाटील यांनी माझी चौकशी करण्यासाठी चौकशी करावी, म्हणून स्वाक्षरी केली. हे तर, केसाने गळा कापल्यासारखे झाले. नंतर आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सरकार कोसळले आणि राष्ट्रपती राजवट लागली.'
अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवारांचे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील होते. मी पाटील कुटुंबाची माफी मागितली. कारण, मला ते वक्तव्य पटले नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत आहे. दरम्यान, अजित पवार हे सत्तेत असलेल्या महायुतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत आहेत.