Sharad Pawar NCP Campaign Song launched: राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली. तर, अनेक पक्षातील नेते राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रचारगीत 'शरद पवार पुन्हा' लॉन्च झाले आहे. याद्वारे तरुण आणि समाजातल्या सर्व घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राष्ट्रवादीचे नवे प्रचारगीत लॉन्च केले. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की,'महाराष्ट्राच्या मनात स्वाभिमानी विचारांचा जागर करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाचे नवे प्रचारगीत प्रदर्शित करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या रणांगणात ताकदीने लढणा-या प्रत्येकाच्या मनात ‘शरद पवार पुन्हा…!’ हे गीत सळसळती उर्जा निर्माण करेल.'
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला पक्ष फूटीनंतर निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलेले आहे. या निवडणूक चिन्हाबाबत दोन शरद पवार गटाने दोन विनंती केल्या होत्या. त्याची नोंद निवडणूक आयोगाने घेतली आहे. शरद पवार पक्षाचे म्हणणे होते की, त्यांचे चिन्ह योग्य नाही. ते मतपत्रिकेवर लहान दिसते आणि तुतारी सारखे दिसणारे दुसरे चिन्हे हटविण्यात यावे. शरद पवार यांच्या पक्षाच्या दोन्ही विनंत्या मान्य करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांतील मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. झारखंडमध्ये येत्या १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ आणि २९ ऑक्टोबर, अर्जांची छाननी २८ आणि ३० ऑक्टोबर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख अनुक्रमे ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या ४८ जागांसाठी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. पाच वर्षांपूर्वी २३ जिंकलेल्या भाजपला यावेळी ९ जागांवर समाधान मानावे लागले. तर, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.
संबंधित बातम्या