Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका, कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका, कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी

Abu Azmi: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका, कार्यकर्त्यांची रुग्णालयाबाहेर गर्दी

Nov 18, 2024 09:34 PM IST

Abu azmi hospitalized: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर येत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना हृदयविकाराचा झटका

Abu Azmi News: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. अबू आझमी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केली. सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचे समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अबू आझमी यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 'अबू आझमी यांची तब्येत बिघडली होती म्हणून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती ठिक असून ते घरी परतले आहेत', अशी माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आली.

अबू आझमी मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. या मतदारसंघात मोठी ताकद आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून ते सलग तीन वेळा निवडून आले. या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे. अबू आझमी यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे अबू आझमी यांच्यासमोर कडवे आव्हान आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या केवळ दोन जागा दिल्याने नाराज झालेल्या समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांनी हरियाणातील पराभवातून काँग्रेसने कोणताही धडा घेतलेला नाही, अशी घणाघाती टीका केली. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने संयुक्त आघाडी म्हणून निवडणूक लढवायला हवी होती, पण त्यांनी सपाच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले नाही, असे आझमी म्हणाले.

२० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने आठ उमेदवार उभे केले. भाजपला पराभूत करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते इतर जागांवर महाविकास आघाडीला मदत करतील, असे आझमी यांनी स्पष्ट केले. हरियाणात समाजवादी पक्षासोबत युती केली नाही आणि पराभूत झाले. ते धडा शिकतील असे आम्हाला वाटले होते, पण त्यांनी तसे केले नाही, असे आझमी यांनी काँग्रेसचा उल्लेख केला. समाजवादी पक्ष हरियाणात काँग्रेससोबत आघाडी करू इच्छित होता, पण राज्य नेतृत्वाकडून त्याला विरोध होत असल्याने तो होऊ शकला नाही. एक्झिट पोल आणि राजकीय पंडितांना डावलून भाजपने गेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा हरियाणात विजय मिळवला, असेही त्यांनी म्हटले.

'महाविकास आमच्यासाठी फक्त दोन जागा सोडल्या आहेत. आम्हाला दोनच जागा देण्यात आल्या, असे त्यांनी आमच्याशी बोललेही नाही. याची माहिती आम्हाला माध्यमांमधूनच मिळाली. त्यांनी आम्हाला बैठकीचे आमंत्रणही दिले नाही,' असे आझमी यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील जागावाटपावर नाराजी व्यक्त केली. याशिवाय, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, तुळजापूर, परांडा, औरंगाबाद पूर्व, मालेगाव मध्य आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून पक्षाने सात उमेदवार उभे केले आहेत. आझमी यांचा मानखुर्द शिवाजीनगर आणि भिवंडी पश्चिम मतदारसंघ वगळता इतर सहा मतदारसंघात महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर