"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, बाळासाहेब असते तर.."; सदा सरवणकरांचं मोठं विधान
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, बाळासाहेब असते तर.."; सदा सरवणकरांचं मोठं विधान

"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, बाळासाहेब असते तर.."; सदा सरवणकरांचं मोठं विधान

Published Oct 30, 2024 07:45 PM IST

Mahim Constituency : बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिममध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली, असं विधान सदा सरवणकर यांनी केलं आहे.

सदा सरवणकरांची राज ठाकरेंना पाठिंबा देण्याची विनंती
सदा सरवणकरांची राज ठाकरेंना पाठिंबा देण्याची विनंती

राजसाहेब माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका, मला समर्थन द्या, अशा शब्दात विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.सदा सरवणकर यांनी बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दाखला देत राज ठाकरेंना हे आवाहन केलं आहे. बाळासाहेबांनी देखील नातेवाईकांना सीट सोडायला सांगितलं नसतं असं देखील त्यांनी म्हंटलं आहे. मला समर्थन द्या अशीही विनंती सरवणकर यांनी राज ठाकरे यांना केली आहे.

माहीम मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तर याच मतदारसंघातून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे सुद्धा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.उद्धव ठाकरे गटाकडूनही या मतदारसंघातमहेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघाची तिरंगी लढत होत असून याची चर्चा राज्यभरात रंगली आहे. त्यातच सदा सरवणकर यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे.

काय म्हणाले सदा सरवणकर?

सदा सरवणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी चाळीस वर्षापासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आम्ही आमच्या कष्टाने आणि घामाने तीन वेळा माहिमचा आमदार झालो. बाळासाहेब असते तर त्यांनी मला आपल्या नातेवाईकांसाठी सीट सोडायला सांगितलं नसतं. त्यांचे पन्नास नातेवाईक दादर - माहिममध्ये राहतात पण उमेदवारी त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली. ते कार्यकर्त्याची भावना जपणारे नेते होते असं त्यांनी सांगितले.

शिवाय एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहा, त्यांचे सुपुत्र हे तीन वेळचे खासदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलाला केंद्रात मंत्री बनवले नाही तर एका निष्ठावंत शिवसैनिकाला ती संधी दिली. राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका. मला आपले समर्थन द्या अशी विनंती सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंकडे केली आहे.

सरवणकर यांनी म्हटले की, गेली ३० वर्ष मी या मतदारसंघात रात्रंदिवस काम करतोय. मतदारांसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वसामान्य शिवसैनिकाला राजसाहेबांनी आशीर्वाद द्यावेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाटत होतं की, खेळीमेळीच्या वातावरणात हे सर्व व्हावे. परंतु मतदारांचा आग्रहअसल्याने मला निवडणुकीतून माघार घेणे अवघड होत असल्याचं सरवणकरांनी म्हटलं आहे.

भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रिंगणात उतरले असून ते माहिम मतदारसंघातून लढत आहेत. भाजपने राज ठाकरेंच्या लोकसभेतील पाठिब्यांची परतफेड करत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. मात्र या जागेवर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना तिकिट देण्यात आले आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदेंचीही तीच इच्छा आहे. मात्र तिथल्या उमेदवाराचे म्हणणे आहे की, जर त्यांनी माघार घेतली तर शिवसेनेची मते उठाबाकडे जाण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या