कुठलाही धर्म संकटात नाही, तसं सांगणाऱ्यांचे पक्ष संकटात आहेत; अभिनेता रितेश देशमुख याचा भाजपवर हल्लाबोल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कुठलाही धर्म संकटात नाही, तसं सांगणाऱ्यांचे पक्ष संकटात आहेत; अभिनेता रितेश देशमुख याचा भाजपवर हल्लाबोल

कुठलाही धर्म संकटात नाही, तसं सांगणाऱ्यांचे पक्ष संकटात आहेत; अभिनेता रितेश देशमुख याचा भाजपवर हल्लाबोल

Nov 11, 2024 07:40 PM IST

Maharashtra assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुख आपला भाऊ आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी लातूर येथे पोहोचला.

कुठलाही धर्म संकटात नाही, खरंतर त्यांचे पक्ष संकटात आहेत; अभिनेता रितेश देशमुख याचा भाजपवर हल्लाबोल
कुठलाही धर्म संकटात नाही, खरंतर त्यांचे पक्ष संकटात आहेत; अभिनेता रितेश देशमुख याचा भाजपवर हल्लाबोल

Riteish Deshmukh News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी तीव्र होत असताना बॉलिवूड अभिनेता आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र रितेश देशमुख आपला भाऊ आणि काँग्रेस नेते धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये पोहोचला. त्यावेळी रितेश देशमुख यांनी धर्म धोक्यात असल्याचा दावा करणाऱ्या पक्षच धोक्यात आहे, असे रितेश देशमुखने म्हटले आहे.

रितेश देशमुख म्हणाला की, ‘जे लोक आपला धर्म धोक्यात असल्याचा दावा करतात, त्यांचा पक्षच धोक्यात आहे आणि ते आपला पक्ष आणि स्वत:ला वाचवण्यासाठी धर्माचरण करत आहेत. त्यांना सांगा आम्ही आमचा धर्म सांभाळू, तुम्ही आधी विकासाबद्दल बोला’, असा टोला रितेश देशमुखने लगावला.

'राज्यातील सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. कृती हाच धर्म आहे असे भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे. जो प्रामाणिकपणे काम करतो,त्यालाचा धर्म म्हणतात. जे काम करत नाहीत त्यांना धर्माचा आधार घ्यावा लागतो. त्यांना सांगा आधी विकासावर बोला, आम्ही आमच्या धर्माचे रक्षण करू', असेही रितेश देशमुख म्हणाला.

रितेश देशमुख यांनी तरुणांना आपल्या मताचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन करत महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करताना प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचे आणि अधिकारांचे रक्षण करण्याची गरज व्यक्त केली. रितेश देशमुख याचे धाकटे बंधू धीरज देशमुख लातूर (ग्रामीण) विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख १.२१ लाख मतांनी विजयी झाला होता.

लातूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला

लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जातात. लातूर शहरातून काँग्रेसला दोनदा तर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसला फक्त एकदाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लातूरची जागा दीर्घकाळ देशमुख कुटुंबाकडे आहे. विरसराव देशमुख हे लातूरमधून ५ वेळा विजयी झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये सीमांकन झाल्यानंतर लातूरची जागा लातूर शहर आणि लातूर ग्रामीण अशा दोन भागात विभागली गेली.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाडींमधील राजकीय लढाई तीव्र होत चालली आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर