Raj Thackeray News: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली आहे. या निवडणुकीत पक्षाने १२५ उमेदवार उभे केले. पंरतु, त्यांना भोपळा फोडता आला नाही. यातच पक्षाच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली. या निवडणुकीत मनसेचे तीन पेक्षा अधिक उमेदवार निवडून न आल्यास त्यांच्या अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या निवडणुकीत अनेक पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, त्यात राज ठाकरे यांच्या पक्षाचाही समावेश होता. कारण, गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत खराब कामगिरी केली. दरम्यान, या निवडणुकीत मनसेचे तीन आमदार निवडून न आल्यास त्यांच्या पक्षाची मान्यता धोक्यात येईल, असे निवडणूक आयोगाने निकालापूर्वीच स्पष्ट केले. या निवडणुकीतील निकाल मनसेसाठी धक्कादायक ठरला. कारण, या निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. यामुळे पक्षाची मान्यता धोक्यात येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने १३ जागा जिंकून सर्वोत्तम कामगिरी केली. पण या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यात पक्षाला अपयश आले आणि २०१९ च्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेची मतांची टक्केवारी २००९ च्या ४.१ टक्क्यांवरून १.५ टक्क्यांवर आली. निवडणुकीत मनसेने सत्ताधारी महायुतीला पाठिंबा दिला असला तरी पक्षाने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली.
पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्यात राज्याचे नेतृत्व अपयशी ठरल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. सरकार तरुणांच्या आकांक्षांकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच राज्यात सार्वजनिक पायाभूत सुविधांचा अभाव आहे, याचा उल्लेख राज ठाकरे यांनी आपल्या अनेक सभेत केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना राज ठाकरे यांनी २००६ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे पक्ष सोडला. त्याचवर्षी हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या अजेंड्यावर आपला पक्ष उभा करत त्यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर मनसेने विधानसभा निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करून इतर राजकीय पक्षांना चिंतेत पाडले. मात्र, त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. दरम्यान, २०१४ च्या विधानसभेपूर्वी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावा लागले.