Mumbai: फक्त शाईचं बोट दाखवा अन् दुकानं, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिळवा २० टक्के सूट!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: फक्त शाईचं बोट दाखवा अन् दुकानं, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिळवा २० टक्के सूट!

Mumbai: फक्त शाईचं बोट दाखवा अन् दुकानं, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिळवा २० टक्के सूट!

Nov 09, 2024 01:59 PM IST

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदाराला मुंबईतील निवडक रेस्टॉरंट्स, मल्टिप्लेक्समध्ये २० टक्के सूट मिळणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली.

 फक्त शाईचं बोट दाखवा अन् दुकानं, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिळवा २० टक्के सूट!
फक्त शाईचं बोट दाखवा अन् दुकानं, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिळवा २० टक्के सूट! (HT)

Mumbai News: मुंबईतील निवडक दुकाने, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मतदारांना शाईचे बोट दाखवल्यानंतर २० टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी येथे केली.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. व्यापारी, मल्टिप्लेक्स मालक आणि रेस्टॉरंट मालकांच्या संघटनांशी चर्चा करून मतदानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मतदानाचा टक्का वाढावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाने शुक्रवारी 'उत्सव निवादनूकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' या मतदान जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला.

गेट वे ऑफ इंडियायेथे झालेल्या या कार्यक्रमाला निवडणूक आयोग, मुंबई पोलीस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर, मोहन जोशी, रोहित शेट्टी आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या संकल्पनेतून हा सवलतीचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुंबईचे नोडल निवडणूक अधिकारी फारोग मुकादम यांनी दिली.

गगराणी यांनी फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन, असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट्स आणि इतर काही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत ३१ ऑक्टोबर रोजी बैठक घेतली. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मतदारांना सवलत देण्याचे त्यांनी मान्य केले. ते अनेकदा इतर प्रसंगी सवलत देतात, त्यामुळे मतदानासाठी हीच सवलत देता येईल का, अशी विचारणा करण्यात आली. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक होता, असे मुकादम यांनी सांगितले.

शहरातील पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, स्टर्लिंग, मुक्ता, मूव्हीमॅक्स आणि मूव्ही टाइम या मल्टिप्लेक्स साखळींनी २० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत मतदारांना २० टक्के सवलत देण्याचे मान्य केले आहे. 'एएचएआर'ने २० व २१ नोव्हेंबर रोजी मतदारांना शाईचे बोट दाखविल्यास जेवणावर १० ते २० टक्के सवलत दिली आहे, अशी माहिती मुकादम यांनी दिली. ही ऑफर ऑनलाइन बुकिंग किंवा खरेदीसाठी वैध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र रिटेल असोसिएशन आणि रिलायन्स रिटेल आउटलेट्स २० नोव्हेंबरला १० ते १५ टक्के सूट देतील, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शहरातील अनेक रेस्टॉरंट्स आणि किरकोळ दुकानांनी स्वत:हून अशीच सवलत दिली होती.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर