MNS Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या घोषणेचा धडाका सुरूच आहे. मनसेकडून सहावी यादी जाहीर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या यादीमध्ये ३२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, बीड, परभणी, नांदेड इ. जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.मनसेने आतापर्यंत ११० उमेदवारांची घोषणा केली आहे.
मनसेच्याया यादीत नाशिक पूर्वमधून प्रसाद सानप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच देवळाली मतदारसंघातून मोहिनी जाधव, नाशिक मध्यमधून अंकुश पवार, जळगाव ग्रामीणमधून मुकुंदा रोटे, विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर, उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मनसेच्या या यादीचे वैशिष्ट्ये म्हणजे राज ठाकरे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्या विरोधातही उमेदवार दिला आहे. साईप्रसाद जटालवार यांना भोकरमधून श्रीजया यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.
राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात विद्यमान आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत एकूण ४५ उमेदवारांची नावे होती,त्यानंतर तिसऱ्या यादीत १३, चौथ्या यादीत ५,पाचव्या यादीत १५, सहाव्या यादीत ३२ असे एकूण आतापर्यंत ११० उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर; अंधेरी, संभाजीनगर पूर्व मधील उमेदवार बदलले
मनसेने आपल्या दुसऱ्या यादीत माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या मतदारसंघातून शिवसेनेकडून सदा सरवणकर यांना उतरवले आहे. मात्र आता महायुतीकडून सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरवणकर यांना एकनाथ शिंदे यांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला असल्याचे समजते. त्यामुळे माहीम मतदारसंघाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
संबंधित बातम्या