MNS Fourth Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीत पुणे, चिखली, कोल्हापूरचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
मनसेच्या या यादीत पुण्यातील कसबा पेठ, चिखली, कोल्हापूर उत्तर, केज व कलिना या विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मनसेच्या चौथ्या यादीमध्ये ५ जणांचा समावेश असून यात पुण्यातील कसबा पेठेच्या उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे. मनसेने कसबा पेठेतून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसने कसब्यातून तत्कालीन आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर आपला बालेकिल्ला असूनही भाजपने कसब्यात अजून उमेदवार निश्चित केला नाही. धंगेकर यांनी लोकसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिला होता.
कसबा पेठ मतदारसंघात भाजपकडून हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या तिकीटासाठी रस्सीखेच सुरू आहे. कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यात लढत झाली होती. मात्र या निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला होता, त्यामुळे यंदा आपल्याला तिकीट मिळावं, यासाठी धीरज घाटे आग्रही आहेत.
गणेश भोकरे,कसबा पेठ
गणेश बरबडे,चिखली
अभिजित राऊत,कोल्हापूर,उत्तर
रमेश गालफाडे,केज
संदीप उर्फ बाळकृष्ण हटगी,कलीना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली चौथी यादी (MNS Fourth List ) सोशल मीडियावर प्रसिद्ध केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावेळी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची जोरदार तयारी केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्राचा दौरा केला. तसंच या वेळी आपण २०० ते २२५ जागा लढणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार आता ही नावं समोर येत आहेत.
मनसेने ७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मंगळवारी ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. त्यानंतर १३ नावांची तिसरी यादी जाहीर कऱण्यात आली. मनसेच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरे यांचेही नाव आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून माहिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर मनसेने वरळीत संदीप देशपांडे यांना उमेदवारी देत आदित्य ठाकरेंसमोर तगडे आव्हान निर्माण केले आहे.
संबंधित बातम्या