Maharashtra Vidhansabha Election 2024 : लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर नारा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे.
राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरताना ते स्वतः हजर राहणार आहेत. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
राज ठाकरे यांनी आज ठाणे-पालघर मनसेचे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधवला यांना ठाण्यातून मनसेची उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे स्वतः २४ ऑक्टोबरला जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात येणार आहेत.
याशिवाय मनसेचे कल्याण (ग्रामीण)चे विद्यमान आमदार राजू पाटील यांचीही उमेदवारी राज ठाकरेंनी जाहीर केली. मनसेच्या तिसऱ्या यादीवर हात फिरवला जातोय. उद्या जाहीर करण्याची शक्यता.
महाराष्ट्रात विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी महायुतीला कोणत्याही अटी-शर्थीशिवाय पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. आता राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड महायुतीकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मनसेच्या काही उमेदवारांना पाठिंबा देण्यासंदर्भात महायुतीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची शनिवारी रात्री बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. मुंबईत एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री शिंदे-फडणवीस आणि ठाकरे यांच्यात विधानसभेच्या रणनितीबाबत चर्चा झाली. या बैठकीत काही मतदारसंघाबाबत मनसे-महायुती युतीबाबत खलबतं झाली. दोन तास झालेल्या या चर्चेत शिवडी, वरळी आणि माहिम या मतदारसंघासह इतर काही जागांबाबत चर्चा झाली आहे. आता महायुती आणि मनसे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवडी मतदारसंघातून मनसे नेते बाळा नांदगावकर निवडणूक लढवत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करत राज्यात दौरेही काढले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेच्या उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानुसार, आत्तापर्यंत ७ उमेदवार जाहीर करण्यात आले असून राज ठाकरेंनी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान,शिंदे फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री गुप्त बैठक घेतली. या बैठकीत महायुतीत पुन्हा बिनशर्त पाठिंब्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिवडी मतदारसंघ -बाळा नांदगावकर, पंढरपूर-मंगळवेडा मतदारसंघ - दिलीप धोत्रे, लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे, हिंगोली विधानसभा - बंडू कुटे, चंद्रपूर मतदारसंघ- मनदीप रोडे, राजुरा मतदारसंघ - सचिन भोयर, यवतमाळ – राजू उंबरकर.
संबंधित बातम्या