महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबागमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
एकीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना शेकापनं चार उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली आहे. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. जयंत पाटील यांनी पेण- सुधागड, उरण, पनवेल आणि अलिबाग या चार मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे.
शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीत आहे. शेकापनं महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर करण्याआधीच शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे ४ उमेदवार जाहीर केले आहेत.
शेकापने अलिबागमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या मेळाव्यात पक्षाने चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. शेतकरी कामगार पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केल्याचं दिसून आलं. या मेळाव्याला महिलांची संख्या लक्षणीय होतं.
जयंत पाटील यांनी चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. शेकापचे अतुल म्हात्रे हे पेण सुधागड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. उरणमधून शेकापचे प्रीतम म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.पनवेल मधून माजी आमदार बाळाराम पाटील लढणार आहेत. तर, अलिबागमधून शेकापच्या महिला आघाडी प्रमुख आणि जयंत पाटील यांच्या स्नुशा चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना जयंत पाटील यांनी सर्व जागा महाविकास आघाडीमधूनच लढवणार असल्याचं जाहीर केलं.
दरम्यान मविआत शेकाप शिवाय, भाकप, माकपनं देखील मविआकडे जागांची मागणी केली आहे. मात्र प्रमुख पक्षांमध्ये जागावाटप झालं नसताना शेकापनं उमेदवार जाहीर केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. छोट्या पक्षांच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.