Voting Holiday : मुंबईत मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, निर्देशाचे उल्लंघन केल्यास कारवाई
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Voting Holiday : मुंबईत मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, निर्देशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

Voting Holiday : मुंबईत मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी, निर्देशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

Nov 07, 2024 11:54 AM IST

Maharashtra Assembly Election 2024: मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबईतील कर्मचाऱ्यांना २० नोव्हेंबरला पगारी सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी
मुंबईत मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी (HT)

Maharashtra Assembly Election News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवसाय आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे निर्देश मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच या निर्देशाचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कारवाई केली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने गगराणी यांनी येथे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. मुंबईतील सर्व कर्मचाऱ्यांना २० नोव्हेंबर रोजी मतदानासाठी पगारी सुट्टी द्यावी आणि हा नियम सर्व औद्योगिक क्षेत्रे, महामंडळे, कंपन्या आणि इतर आस्थापनांना लागू होईल.

सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, कॉर्पोरेशन्स, उपक्रम संस्था, औद्योगिक गट, व्यापारी इतर सर्व आस्थापने यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बुधवार नोव्हेंबर २०२४ रोजी कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांना रजा देणे बंधनकारक आहे,’ असे महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अपवादात्मक परिस्थितीमुळे पूर्ण दिवसाची सुट्टी शक्य नसल्यास जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन किमान चार तासांची सुट्टी देण्यात यावी. लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १३५ (ब) नुसार, ज्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे जनतेला किंवा त्यांच्या आस्थापनाला धोका निर्माण होईल, त्यांना दंड केला जाणार नाही. या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून निवडणुकीच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. दरम्यान, २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२, शिवसेनेला ६४ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत राज्यातील कोणाच्या बाजूने कौल देणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर