Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात मुख्य लढत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन आघाड्यांमध्ये आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचे नुकसान होऊ शकते, असे मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून मतभेद झाल्यानंत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांना अपयश आले. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत खळबळजनक वक्तव्य केले आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दुबईत भेट घेतली होती, असा दावा त्यांनी केला आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते आधी लंडन आणि नंतर कॅलिफोर्नियाला बैठकीसाठी गेले होते. लंडनला गेल्यानंतर ते दुबईला गेले, जिथे त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली. ही भेट १९९९ ते १९९१ सालादरम्यान झाली. या भेटीला केंद्र सरकारने मान्यता दिली होती का?' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्याबाबत शरद पवार किंवा त्यांचा पक्ष राष्ट्रवादीकडून अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
महत्त्वाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभूत झाले. आता विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला किती जागा जिंकता येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही, त्यांना अजूनही शनिवारपर्यंत (१९ ऑक्टोबर २०२४) पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नाही, त्यांनी electoralsearch.eci.gov.in ह्या संकेत स्थळावर Voter Helpline ॲपवर मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे.नाव नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी करावी. मतदार यादीत नाव नोंदवण्याची आज शेवटची संधी आहे.