Raj Thackeray News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी राज्यभरामध्ये प्रचारसभांचा मोठा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघ पिंजून काढले आहेत. मात्र, राज ठाकरेंच्या नाशिक येथील सभेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. नाशिकमध्ये आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना राज ठाकरेंनी निवडणुकीचा काळ म्हणजे कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे.
नाशिक मध्ये बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो कंटाळवाण्या असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती पकपक.कधीतरी भाषण करणे ठिक असते. पण निवडणुकीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच बोलायचे.' पुढे जनतेला आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की, 'निवडणुका गेल्या तेल लावत. राजकीय पक्ष मेले तरी चालतील. पण महाराष्ट्र जगला पाहिजे. ती काळाची गरज आहे. ही सगळी मंडळी त्यापासून दूर लोटत आहेत. तालुक्यात विकास करू शकलो नाही, उद्योगधंदे करू शकलो नाहीत, यासाठी विष कालवले जात आहे. हे सर्व उद्योग यासाठी सुरू आहेत. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की, राजकारण काय सुरू आहे.'
दरम्यान, कालच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांची भिवंडी येथे प्रकृती बिघडली. त्यामुळे राज ठाकरेंनी व्यासपीठावर न जाता थेट मनसैनिकांशी संवाद साधण्यासाठी गेले. त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांच्या भाषणात सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले, तसेच मनसेचे उमेदवार विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नक्की येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून वनिता कथोरे आणि भिवंडी पूर्व मतदारसंघातून मनोज गुळवी यांना उमेदवारी जाहीर केली.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत असणार आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागेवर यश मिळाले होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत भाजपला १२२, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.