Maharashtra Assembly Election 2024: नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले. मात्र, राम सातपुते यांना मिळालेली मते मार्कडवाडी ग्रामस्थांना मान्य नसून त्यांनी स्वखर्चाने पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. मार्कडवाडी ग्रामस्थांनी घेतलेला निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
'मार्कडवाडी (सोलापूर) गावातील लोकांनी स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात भाजपच्या राम सातपूतेना लिड मिळालेले आहे, जे गावकऱ्यांना मान्य नाही, बघू सातपुते तयार होतात की नाही? दूध का दूध पाणी का पाणी होवून जाऊ द्या!', अशा आशयाचे अतुल लोंढे यांनी ट्विट केले आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तम जानकर आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तम जानकर यांना १ लाख २१ हजार ७१३ मते मिळाली. तर, राम सातपुते यांना १ लाख ०८ हजार ५६६ लोकांनी मतदान केले. दरम्यान, मार्कडवाडी गावात सातपुते यांना १००३ मते मिळाली आणि जाणकर यांना फक्त ८४३ मते मिळाली. मार्कडवाडी ग्रामस्थांच्या मते या गावात आजपर्यंत शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना आघाडी मिळत होती. पण यंदा त्यांना कमी मते मिळाल्याने गावकऱ्यांनी स्वखर्चाने बॅलेटपेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. येत्या ३ डिसेंबरला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव मार्कडवाडी ग्रामस्थांनी केला आहे.
महाराष्ट्रात नुकतीच विधानसभेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महायुतीला एकूण २३३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर, महाविकास आघाडीने फक्त ५० जागा जिंकल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भाजपला १३२ जागेवर विजय मिळवता आहे. तर, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे आणि अजित पवार गटाला अनुक्रमे ५७ आणि ४१ जागेवर विजय मिळवता आला. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेला १६ जागा मिळाल्या. तर, ठाकरे गट आणि शरद पवार गटाला अनुक्रमे २० आणि १० जागा जिंकत्या आल्या.