Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. यंदा पहिल्यांदाच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत असली तरी वंचित, मनसे तसेच परिवर्तन आघाडीचे उमेदवार रिंगणात असणार आहेत. मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यामुळे राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची याद्या तयार केल्या जात आहेत. महायुतीने आत्तापर्यंत १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून अद्याप एकाही उमेदवाराचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली नसून त्यांच्या यादीची प्रतिक्षा आहे. महायुतीकडून भाजपने ९९, शिंदे गट ४५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३८ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.
महायुती व महाविकास आघाडीशिवाय इतरही पक्षांनी व आघाड्यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामध्ये, मनसेनं ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यापूर्वी, मनसेकडून ७ उमेदवारांची घोषणा केली होती. भाजपकडून दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत दिल्लीत खलबते सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. २८८ जागा असलेल्या विधानसभेसाठी महायुतीकडून अद्याप १०६ उमेदवारांच्या नावांची घोषणा होणे बाकी आहे. महाविकास आघाडीच्या २८८ मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिक्षा आहे.
महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बहुतांश विद्यमान आमदार व मंत्र्यांना पुन्हा संधी दिली आहे. शिंदे गट व अजित पवार गटाकडून बंडात साथ देणाऱ्यांना झुकते माप दिल्याचे दिसत आहे. आता पुढील उमेदवारांची नावे जाहीर करताना तीनही पक्षांकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येतो की, इच्छुकांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. महायुतीत उमेदवारी मिळवण्यासाठी घटक पक्षांमध्येच नेत्यांचे पक्षांतर सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र महाविकास आघाडीत अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरु असलेली रस्सीखेच अखेर आता थांबली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असून यात काँग्रेसच मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस सर्वाधिक १०५ जागा लढणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट ९५ जागांवर आपले उमेदवार देणार आहे. शरद पवार गट ८४ जागांवर लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद होणार आहे. यात जागावाटप जाहीर केलं जाणार आहे. मात्र विदर्भातील व मुंबईतील ७ ते ८ जागांचा तिढा अजून सुटला नसल्याने महाविकास आघाडीकडून जागावाटपास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यातच महाविकास आघाडीतील छोटे घटक पक्ष शेतकरी कामगार पक्ष व समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जाहीर केल्याने मविआची चांगलीच पंचाईत झाली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने उमेदवार निवडणुकीत उतरवले आहेत. समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीकडे १२ जागा मागितल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीने त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर शेकापने रायगड जिल्ह्यातील चार जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.
संबंधित बातम्या