Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोनच दिवस शिल्लक असताना सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर निशाणा साधत वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या आहेत. काँग्रेसला मत देऊ नका, असे आवाहन भाजपने जाहिरातीद्वारे केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजप नेत्यांच्या व्यंगचित्रांसह जाहिराती प्रसिद्ध करून महायुतीला ‘महाअभद्र युती’ असे संबोधले आहे. या जाहिराती अनेक मोठ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
भाजपने दिलेल्या जाहिरातींमध्ये मुंबईत १९९३ झालेले साखळी बॉम्बस्फोट, २००६ साली ट्रेनमध्ये झालेला बॉम्बस्फोट, २६/११ चे दहशतवादी हल्ले आणि २०१० च्या पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय, कोविड महामारीच्या काळात महाविकास आघाडीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपने महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने शेतकरी आत्महत्या, खोटी आश्वासने, रस्त्यांची दुरवस्था, नोकरी, बेरोजगारी आणि गुन्हेगारीवरून भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या जाहिरातीत वापरण्यात आलेल्या व्यंगचित्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यंगचित्र दाखवण्यात आले आहे. दुसऱ्या व्यंगचित्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याभोवती जमलेले दाखवले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने कौल देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यापूर्वी सांगितले होते की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ९.६३ कोटी मतदार मतदान करतील. त्यापैकी ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. तर, ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. याशिवाय, १.८५ कोटी तरुण मतदारांचे वय २० ते २९ वर्षे दरम्यान आहे. त्याचवेळी, २०.९३ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. १२.४३ लाख मतदार ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. यासोबतच ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या ६ हजार ३१ आहे.