
Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही, तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आले आहे. या यादीनुसार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह १४ विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मुंबईतील १३ मतदारसंघातील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने १५ पैकी १४ आमदारांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. मात्र मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात सस्पेन्स कायम ठेवला आहे. येथे विद्यमान आमदार अजय चौधरी असून त्यांना पुन्हा संधी मिळणार की, सुधीर साळवी यांना तिकीट मिळणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून केदार दिघे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून, ठाण्यातून राजन विचारे, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई, गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवी, कुडाळमधून वैभव नाईक, शाहूवाडीमधून सत्यजीत आबा पाटील, बाळापूरमधून नितीन देशमुख, अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आमदार आहेत. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले. त्यामुळे एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आली असून तेथे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
