Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज (२९ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी संपली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा समोर आला आहे. या आकड्यानुसार महायुतीमध्ये भाजप बिग बॉस ठरला असून भाजपने १४८ जागांवर कमळ चिन्हावर उमेदवार दिले असून अनेक ठिकाणी आपल्या नेत्यांना घटक पक्षांकडून उमेदवारी मिळवून दिली आहे. या जागावाटपात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ८५ आणि अजित पवार गटाला (Ajit Pawar) ५१ जागा आल्या आहेत. उर्वरित ०७ जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत.
महायुतीमध्ये जागावाटपाची बोलणी सुरू झाल्यानंतर भाजपने आघाडी घेत ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर दुसरी यादी २२ उमेदवारांची, २५ उमेदवारांची तिसरी यादी आणि अंतिम यादीत २ जणांच्या नावाची घोषणा करत एकूण १४८ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. तर शिवसेना शिंदे गटाने पहिल्या यादीत ४५, दुसऱ्या यादीत २०, तिसऱ्या यादीत १३ आणि शेवटच्या चौथ्या यादीत ७ उमेदवारांची घोषणा केली आहे.
यातील २ जागांवर मित्रपक्षांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पहिल्या यादीत ३८, दुसऱ्या यादीत ७, तिसऱ्या यादीत ४ आणि शेवटच्या यादीत २ उमेदवारांची घोषणा केली आहे. याशिवाय महायुतीने आपल्या मित्र पक्षांना ४ जागा दिल्या आहेत. महायुतीने ३ जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
२०१९ च्या निवडणुकीत भाजपाने १६४ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी १०५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपने महायुती धर्माचे पालन करत १६ जागा कमी लढवल्या आहेत. शिंदे गटाने वाटाघाटी करत ८५ जागांपर्यंत मजल मारली आहे. अजित पवार गटाला ५१ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.
संबंधित बातम्या