Eknath Shinde Property News In Marathi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीकडे अधिक संपत्ती असल्याचे समोर आले.
दरम्यान, २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती ११ कोटी ५६ लाख ७२ हजार ४६६ रुपये इतकी होती. गेल्या पाच वर्षात यात २६.१२ कोटींची वाढ झाली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांची एकूण संपत्ती ३७ कोटी ६८ लाख ५८ हजार १५० रुपये इतकी झाली आहे. लता शिंदे यांची संपत्ती २०१९ मध्ये ६ कोटी ११ लाख इतकी होती. यात गेल्या पाच वर्षात २२ कोटी ८५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा त्यांची पत्नी लता शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे. एकनाथ शिंदे यांचे २०२४ चे वार्षिक उत्पन्न ३४ लाख ८१ हजार रुपये आहे. तर, पत्नी लता शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख ८३ हजार इतके आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नावावर १ कोटी ४४ लाख ५७ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर, त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या नावावर ७ कोटी ७७ लाख २० हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे १३ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, पत्नीकडे १५ कोटी ०८ लाख ३० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर ५ कोटी २९ लाख २३ हजार रुपयांचे कर्ज आहे. तर, पत्नीच्या नावे ९ कोटी ९९ लाख ६५ हजार रुपयांचे कर्ज आहे.
एकनाश शिंदे यांच्याकडे ११० ग्रॅम सोन्याची दागिने आहेत. ज्याची किंमत ७ लाख ९२ हजार रुपये इतकी आहे. तर, त्यांच्या पत्नीकडे ५८० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत ४१ लाख ७६ हजार इतकी आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नावे एका आरमाडा (किंमत ९६ हजार रुपये) आणि एक बोलेरो (किंमत १ लाख ८९ हजार रुपये) अशी दोन वाहने आहेत. तर, पत्नीच्या नावे टेम्पो,दोन इनेव्हा, स्कॉर्पियो कार आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. राज्यात सर्व २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
संबंधित बातम्या