Dhananjay Munde Property: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) रणसंग्राम सुरु झाला आहे. राज्यातील सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उमेदवारी देण्यात आली. ते परळी विधानसभा मतदारसंघातून (Parli Constituency) लढणार आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे. तर, धनंजय मुंडे यांच्याकडे आता किती संपत्ती आहे, हे जाणून घेऊयात.
धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण ५३ कोटी ८० लाखांची संपत्ती आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे १५ कोटींची वाहने आहेत. तर, दीड किलो चांदी आहे. धनंजय मुंडे यांच्या नावावर नावे १५ कोटी ५५ लाख ५ हजार १०५ रुपयांची विविध वाहने आहेत, ज्यात टँकर ते बुलेटपर्यंत अशा एकूण सात वाहनांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांच्याकडे १९० ग्रॅम सोने आहे, ज्यांची किंमत सात लाख तीन हजार रुपये इतकी आहे. धनंजय मुंडे यांची पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे ३१ लाख ७८ हजार ६७५ रुपयांची दोन वाहने आहेत. याशिवाय, राजश्री मुंडे यांच्याजवळ २२ लाख ९० हजारांचे ६२० ग्रॅम सोने आणि ७२ हजारांची दीड किलो चांदी आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या आकडेवारीनुसार, धनंजय मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे एकूण २३ कोटींची संपत्ती होती, ज्यात आता ३१ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
धनंजय मुंडे यांनी विधान परिषद सदस्य आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह परळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. धनंजय मुंडे यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता गुरुवारी दुपारी ०१ वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापूर्वी धनंजय मुंडे यांचे आई रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे यांनी औक्षण केले. यानंतर नंजय मुंडे यांनी नाथरा येथील ग्रामदैवताचं दर्शन घेतले. त्यानंतर पांगरी येथील गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन केले.
संबंधित बातम्या