मागून फेकलेला दगड समोरून लागतो, असे फक्त रजनीकांतच्या चित्रपटात घडतं; अनिल देशमुख प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मागून फेकलेला दगड समोरून लागतो, असे फक्त रजनीकांतच्या चित्रपटात घडतं; अनिल देशमुख प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मागून फेकलेला दगड समोरून लागतो, असे फक्त रजनीकांतच्या चित्रपटात घडतं; अनिल देशमुख प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Nov 19, 2024 10:21 PM IST

Devendra Fadnavis on Anil Deshmukh Attack: माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

अनिल देशमुख प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
अनिल देशमुख प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election 2024: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील प्रचारसभेला उपस्थित राहून काटोल येथे परतत असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्याच्या निषेर्धात विरोधकांकडून भाजप आणि महायुती सरकारविरोधात आवाज उठवला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सलीम-जावेदच्या कथेसारखे आहे. आठ ते १० किलो वजनाचा दगड फेकूनही विंडस्क्रीन किंवा कारच्या बोनटचे नुकसान झाले नाही. पाठीमागून फेकलेला दगडामुळे डोक्याच्या मागच्या बाजुला दुखापत व्हायला पाहिजे होती. परंतु, पाठीमागून फेकलेला दगड समोरून लागतो, असे फक्त सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटात घडते. हा हल्ला नसून सहानुभूती मिळविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका कथेसारखा वाटतो, कारण विरोधकांना या निवडणुकीत पराभव दिसत आहे.

नेमके काय घडले?

नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. दरम्यान, उपचार घेतल्यानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. यानंतर देशमुख यांनी हल्ला करणाऱ्याना कडक इशारा दिला 'मी मरणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही. आपल्यावर ज्याने कोणी हल्ला केला, त्याला सोडणार नाही', असे त्यांनी म्हटले आहे.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने कौल देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर