Devendra Fadnavis Property News In Marathi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव होते. फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली आहे. तर, फडणवीस यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? हे जाणून घेऊयात.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्जासह दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात १३ कोटी २७ लाख ४७ हजार ७२८ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जाहीर केली. कर विवरणपत्रानुसार २०२३-२४ मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न ७९ लाख ३० हजार ४०२ रुपये इतके आहे, जे २०२२-२३ मध्ये ९२ लाख ४८ हजार ९४ रुपये होते. फडणवीस यांच्या नावावर ५६ लाख ७ हजार ८६७ रुपये आहेत. तर, पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावर ६ कोटी ९६ लाख ९२ हजार ७४८ रुपयांची संपत्ती आहे. तर, मुलीच्या नावावर १० लाख २२ हजार ११३ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २३ हजार ५०० रुपयांची रोकड आहे. तर, त्यांच्या पत्नीकडे १० हजारांची रोकड आहे. वित्तीय संस्था एनबीएफसी आणि सहकारी संस्थांमधील मुदत ठेवी आणि ठेवींसह बँक खात्यांमध्ये त्यांच्या ठेवी २ लाख २८ हजार ७६० रुपये आहेत. तर, त्यांच्या पत्नीच्या ठेवी १ लाख ४३ हजार ७१७ रुपये आहेत.
फडणवीस यांनी एनएसएस, टपाल बचत, विमा पॉलिसी आणि वित्तीय साधनांमध्ये २० लाख ७० हजार ६०७ रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पत्नीने रोखे, कर्जरोखे, शेअर्स आणि म्युच्युअल फंडात ५ कोटी ६२ लाख ५९ हजार ३१ रुपयांची गुंतवणूक केली आहे.
फडणवीस यांनी आपल्याकडे ३२ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याचे जाहीर केले आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे ९०० ग्रॅम सोने आहे.फडणवीस यांच्याकडे चंद्रपूर येथील शेतजमीन, नागपुरातील धरमपेठ येथील निवासी इमारत व इतर अनेक मालमत्तांसह ४ कोटी ६८ लाख ९६ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे ९५ लाख २९ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे.
फडणवीस यांच्यावर कोणत्याही बँका किंवाा वित्तीय संस्थांकडून अन्य कोणतेही कर्ज नाही किंवा थकबाकीही नाही. त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नाही. त्यांच्या नावावर चार एफआयआर आणि चार खटले प्रलंबित असल्याचे भाजपच्या फडणवीस यांनी नमूद केले आहे.
संबंधित बातम्या