Eknath Shinde News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले. आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितले की, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, तर, महायुती सरकार मुख्यमंत्री ठरवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याचा निर्णय महायुतीचे मित्रपक्ष घेतील, असे सांगितले. एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.
या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? उद्धव ठाकरे स्वत:च्या स्वार्थासाठी काँग्रेससोबत गेले, असा टोला शिंदे यांनी लगावला. त्यांनी भाजपच्या पाठीवर वार केले. बाळासाहेब आज हयात असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेससोबत जाण्याऐवजी जंगलात जाऊन वन्यजीवांचे फोटो काढायला सांगितले असते. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून झारखंड आणि इतर पोटनिवडणुकांसह महाराष्ट्राचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने आहेत. महायुतीत भाजप, एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांचा समावेश आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. सर्वप्रथम २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आणि भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे बहुतांश खासदार आणि आमदार उपस्थित होते. दरम्यान, गेल्या वर्षी अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारून महाराष्ट्र सरकारमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीत फूट पडली होती.
नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनीही महाराष्ट्राच्या पुढील मुख्यमंत्रिपदाबाबत वक्तव्य केले होते. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येईल आणि विधानसभा निवडणुकीनंतर युतीतील घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असा दावा त्यांनी केला होता. अमित शहा म्हणाले की, 'एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर युतीतील तिन्ही घटक पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील. महाराष्ट्रातील २०१९ च्या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला होता. पण त्यानंतर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र सरकार स्थापन केले, ज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण अडीच वर्षांनंतर सरकार कोसळले.