Chhagan Bhujbal Property News In Marathi: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. तर, छगन भुजबळ यांच्याकडे आता किती संपत्ती आहे, हे पाहुयात.
भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमीन, दोन घरे आहेत. त्यांनी तीन लाख रुपये न्यायालयात अनामत रक्कम म्हणून भरले आहेत. भुजबळ यांच्याकडे ५८५ ग्रॅम सोने आहे. तसेच त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे.
भुजबळ यांच्या पत्नी मीना भुजबळ यांच्या नावे २ कोटी ३८ लाख २९ हजार ५२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ८६ लाख २१ हजार ५७२ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय, ३२ लाख ७६ हजार रुपये किंमतीची ४५५ ग्रॅम सोने, ४ लाख ३७ हजार किंमतीची ५,१५० ग्रॅम चांदी आणि २२ लाख ५ हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत. मीना भुजबळ यांच्या नावावर एक पिकअप वाहन आहे.
२०१९ च्या तुलनेत छगन भुजबळ यांच्या संपत्तीत ८२ लाख रुपयांची भर पडली आहे. तर, मीना भुजबळ यांच्या संपत्तीत ३ कोटी ३५ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात गेले. सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात आहेत.
महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहेत.