विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजपने आतापर्यंत १४६ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. आज तिसरी यादी जाहीर केल्यानंतर भाजपने त्यांच्या कोट्यातून ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी मतदारसंघ भाजपाने त्यांच्या मित्रपक्षांना सोडले आहेत. त्यामुळे महायुतीत भाजपाच्या जागांची संख्या आता १५० झाली आहे.
बडनेरा विधानसभा जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली आहे. तर गंगाखेड मतदारसंघ महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडला आहे. कलिना जागा रादास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडली आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी मतदारसंघ हा विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षासाठी सोडला आहे. भाजपने निवेदन प्रसिद्द करत ४ जागा भाजपाने मित्रपक्षांना सोडल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
भाजपने ४ जागा सोडल्याने महायुतीच्या जागावाटपात भाजपला १५० जागा मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. महायुतीचा जागावाटपाचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर झाला नसला तरी विधानसभा निवडणुकीत भाजपने २५ उमेदवारांची तिसरी यादी सोमवारी जाहीर केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ४ जागा मित्रपक्षांना सोडण्याची घोषणा केली. भाजपने पहिल्या यादीत ९९ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर दुसऱ्या यादीत २२ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर सोमवारी २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केले.
बडनेरा मतदारसंघात भाजपचे तुषार भारतीय इच्छुक होते. पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली आहे. यामुळे तुषार भारतीय अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. आमदार रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिल्याने तुषार भारतीय नाराज झाले आहेत. आता बडनेरा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा असणार आहेत.
राज्यातील सर्व २८८ जागांवर स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा करत काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमधून बाहेर पडला होता. राष्ट्रीय समाज पक्ष २०१४ च्या आधीपासून भाजपासोबत महायुतीमध्ये होता. अनेकदा दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले तरी जानकर महायुतीसोबत कायम होते. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी महादेव जानकर यांना माढा मतदारसंघात उतरवण्याची शक्यता पाहून महायुतीने त्यांना परभणीतून उमेदवारी दिली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. आता रासपला विधानसभेची एक जागा सोडल्यामुळे महादेव जानकर पुन्हा महायुतीत परतणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.