भाजपची चौथी यादी जाहीर; उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  भाजपची चौथी यादी जाहीर; उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा

भाजपची चौथी यादी जाहीर; उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा

Updated Oct 29, 2024 12:00 PM IST

BJP releases 4th list of 2 candidates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: भाजपची चौथी यादी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: भाजपची चौथी यादी जाहीर

Maharashtra assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. भाजपने उमरेड आणि मीरा-भाईंदर मतदारसंघातून तिकीट मिळवलेल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. उमरेड मतदार संघातून सुधीर पारवे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर, मीरा- भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची एकामागून एक यादी जाहीर करताना दिसत आहे. नुकतीच भाजपने आपल्या दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने उमरेड विधानसभा मतदारसंघातून सुधीर पारवे आणि मीरा- भाईंदर मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना संधी दिली. भाजपने आतापर्यंत १५० हून अधिक उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने आपल्या पहिल्याच यादीत ९९ उमेदवारांची नावे घोषित केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या (बुधवारी, ३० ऑक्टोबर २०२४) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे. राज्यातील एकूण २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतील निवडणुकीसाठी २८ ऑक्टोबरपर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर, पवार बालेकिल्ला बारामती आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महायुती विरुद्ध महाविकास

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपला १२२, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या.

 

 

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर