maharashtra assembly election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या हलचाली सुरु झाल्या आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आतापासून तयारी सुरू केली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीतून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली. तशाप्रकारची वक्तव्ये अजित पवार यांनीच केल्यानंतर अशा चर्चेला उधाण आले. याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार हे बारामतीतून लढणार की नाही, यावर भाष्य केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मला साथ दिली नाही, बारामतीला नवा आमदार मिळावा, जेणेकरून मतदारसंघातील मतदारांना त्यांचे महत्त्व कळेल, अशी खंत अजित पवार यांनी बारामतीत रविवारी झालेल्या सभेत बोलताना व्यक्त केली. यानंतर अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
दरम्यान, अजित पवार हे बारामतीतून पुन्हा निवडणूक लढवणार नाहीत का? असे विचारले असता त्यांचे सहकारी आणि मंत्री भुजबळ म्हणाले, 'अजित पवार आमचे कॅप्टन आहेत. ते अशी शस्त्रे टाकू शकत नाही. बारामती विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील आणि मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच भुजबळ यांनी केले आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी अन्य योजनांचे पैसे अडवले जात आहे, असा विरोधकांकडून आरोप केला जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही काही योजनांचे पैसे दोन-तीन वर्ष रखडले होते. सरकारचा अग्रक्रम ठरलेला असतो. कोणाचेही पैसे बुडणार नाहीत, लवकरच पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतील, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांना जागावाटपात सन्मानजनक जागा देण्याचा शब्द दिला आहे, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे उपस्थित होते. महाराष्ट्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.