२३ तारखेला कोंबड्या चोरांचा माज उतरणार, बर्फाच्या लादीवरही झोपवणार, आदित्य ठाकरेंचा राणेंना इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  २३ तारखेला कोंबड्या चोरांचा माज उतरणार, बर्फाच्या लादीवरही झोपवणार, आदित्य ठाकरेंचा राणेंना इशारा

२३ तारखेला कोंबड्या चोरांचा माज उतरणार, बर्फाच्या लादीवरही झोपवणार, आदित्य ठाकरेंचा राणेंना इशारा

Nov 18, 2024 04:29 PM IST

Aaditya Thackeray on Narayan Rane: महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

आदित्य ठाकरेंचा नारायण राणेंना इशारा
आदित्य ठाकरेंचा नारायण राणेंना इशारा

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. राज्यात गेल्या महिन्याभरात राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारावेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे माणगावमध्ये गेले होते. त्यावेळी जनतेशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आमच्यावर टीका करण्यासाठी गेल्या १० वर्ष पगार घेणारी बटली गँग राजकोट किल्ल्यावर माज दाखवत होते. त्यांचा माज येत्या २३ तारखेला उतरवणार. या कोंबड्या चोरांना बर्फाच्या लादीवर झोपवणार. हे आता आम्हाला हिंदुत्त्व शिकवणार आहेत. हे आपल्यात वाद निर्माण करुन बटेंगे तो कटेगे नारा देत आहेत', असेही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर राणे कुटुंबाकडून नेमकी कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचे नेते राज्यभर लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही फसवी योजना आहे. त्यांनी प्रत्येकाच्या खाद्यात १५ लाख रुपये देण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, आता ते महिलांना फक्त १५०० रुपये देत आहेत. ते निर्लज्ज लोक आहेत. झाशीत एवढी मोठी दुर्घटना झाली, तरी त्यांनी आपला एकही कार्यक्रम रद्द केला नाही. उद्या मंत्रालय देखील गुजरातमध्ये घेऊन जाल, त्यामुळे परिवर्तन करणे गरजेचे आहे,असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे गट, अजित पवार गट) यांच्यात मुख्य लढत आहे. २०२९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा, शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत जनता कोणाच्या बाजुने कौल देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

Whats_app_banner