Maharashtra Election : विधानसभा मतदारसंघ २८८, उमेदवारी अर्ज ११ हजार… पुढं काय होणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election : विधानसभा मतदारसंघ २८८, उमेदवारी अर्ज ११ हजार… पुढं काय होणार?

Maharashtra Election : विधानसभा मतदारसंघ २८८, उमेदवारी अर्ज ११ हजार… पुढं काय होणार?

Updated Oct 30, 2024 09:08 AM IST

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटचा दिवस होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागांसाठी ७ हजार ९९५ उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण १० हजार ९०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०१४ पासून लागू झाली. या निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या अर्जांची आज छाननी केली जाणार आहे. तसेच ४ नोव्हेंबर २०२४ अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 

सी-व्हिजिल अ‍ॅप्लिकेशनवर इतक्या तक्रारी दाखल

दरम्यान, सी-व्हिजिल अ‍ॅप्लिकेशनवर १५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या १ हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १,६४६ तक्रारींचे निराकरण निवडणूक आयोगाने केले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. सी-व्हिजिल अ‍ॅप कोणत्याही अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविता येणार आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

दरम्यान, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी कंबर कसली असून विधानसभा निवडणुकीसाठी कोणतीही कसर सोडली नाही. महायुती ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची आघाडी आहे. महाविकास आघाडी ही शिवसेना (यूबीटी) (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (एससीपी) (शरद पवार गट) आणि काँग्रेस पक्षाची आघाडी आहे.

महायुतीसमोर नवे आव्हान

मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) नवाब मलिक यांना उमेदवारी दिली. नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडे असलेल्या या जागेवर शिवसेनेचे सुरेश कृष्णा पाटील यांना 'अधिकृत' उमेदवार घोषित करण्यात आले. ही जागा सध्या समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले…

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवाब मलिक म्हणाले की, आज मी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार म्हणूनही मी अर्ज भरला होता. पण पक्षाने एबी फॉर्म पाठवला असून तो आम्ही दुपारी २.५५ वाजता जमा केला आणि आता मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे.

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा

अणुशक्ती नगरमधून दोन वेळा आमदार राहिलेले नवाब मलिक यांनी युतीतील मित्रपक्ष भाजपच्या दबावामुळे राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. नवाब मलिक यांची कन्या सना मलिक अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार (अजित पवार) म्हणून निवडणूक लढवत आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ , शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपला १२२ , शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर