राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर तुतारीप्रमाणे दिसणारे पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह चांगलेच प्रकाशझोतात आले. एकसारखेच दिसणाऱ्या चिन्हामुळे तुतारीचे मोठ्या प्रमाणावरील मतदान पिपाणीला गेले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचा पराभव झाला,तर काही ठिकाणी मते कमी झाली होती. त्यामुळे हे चिन्ह यादीतून काढून टाकण्याची मागणी पवार यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम राहिले आहे. फक्त त्याचे नाव देताना तुतारी असे न देता ट्रम्पेट असे देण्याचा बदल आयोगाने केला आहे. मात्र तरीही य़ाचा फटका शरद पवारांना बसला आहे.
लोकसभेप्रमाणेच पिपाणी चिन्ह विरोधकांकडून रणनितीचा भाग म्हणून मतदारांचा गोंधळ उडविण्यासाठी वापरण्यात आले. अनेक मतदारसंघात अपक्ष उमेदवांराना हे चिन्ह देण्यात आले आहे. राज्य़ातील जवळपास ५० मतदारसंघात पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. जेथे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा चिन्ह साधर्म्यामुळे पराभव झाला आहे. नगर जिल्ह्यात १२ पैकी ११ मतदारसंघात हे चिन्ह देण्यात आले आहे.
मतदानासाठी पक्षचिन्ह हे पक्षाचा चेहरा असतो. राष्ट्रवादी फुट फडल्यानंतर शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले. तुतारी वाजवणारा माणूस असा त्यात आता बदल करण्यात आला आहे. लोकसभेत पिपाणीने तुतारीसमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. शरद पवारांना त्याचा फटका बसला होता. लोकसभेत नुकसान सहन करावं लागलं होतं. आता विधानसभेतील १६३ जागांवर अपक्षांनी पवार गटाची अशीच झोप उडवली होती.
चिन्ह साधर्म्यामुळे अनेक मतदारांनी तुतारी ऐवजी पिपाणीला भरभरून मतदान केले,जिंतूर, घनसावंगी, बेलापूर, आंबेगाव, अनुशक्तीनगर, केज. परांडा आदी मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवर अपक्ष उमेदवारांना पिपाणी निवडणूक चिन्हदेण्यात आले होते. विशेष म्हणजे ते मिळवण्यासाठीही अपक्ष उमेदवारांमध्ये चढाओढ होती. त्यामुळे नियमानुसार ज्याने ते प्रथम मागितले, त्याला ते देण्यात आले आहे. पिपाणीमुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना मिळणाऱ्या एकूम मतांच्या टक्केवारीवर याचा परिणाम झाला आहे.