Anil Deshmukh News: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे सोमवारी सायंकाळी नागपूरजवळील काटोल येथे परतत असताना बेलफाटा येथे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. देशमुख (वय ७४) यांना उपचारासाठी काटोल येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर नागपूरच्या अॅलेक्सिस सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचे चिरंजीव सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून देशमुख या भागात पूर्णवेळ प्रचार करीत आहेत.
या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या समर्थकांनी काटोल पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, मी घटनास्थळी जात आहे. डेप्युटी एसपी आणि इन्स्पेक्टर घटनास्थळी आहेत. आम्ही तपास सुरू केला आहे.
या घटनेवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली.'राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या मी तीव्र निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात एका माजी गृहमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला होतो यावरून राज्यात कायद्याचे राज्य आहे की गुंडांचे असा प्रश्न पडतो? राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका होण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करून कायदा सुव्यवस्था सुरळीत राहील यासाठी पाऊले उचलली पाहिजेत', असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध.’
गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला. फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? हा राजकीय हल्ला आहे.मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृह मंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. याचा मी निषेध करतो.'
देशमुख हे मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री होते. मनी लॉन्ड्रिंग आणि कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने त्यांना अटक केली होती.