हिंगोलीत निवडणूक आयोगाकडून अमित शहांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगांची तपासणी; व्हिडिओ शेअर करत गृहमंत्री म्हणाले..
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हिंगोलीत निवडणूक आयोगाकडून अमित शहांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगांची तपासणी; व्हिडिओ शेअर करत गृहमंत्री म्हणाले..

हिंगोलीत निवडणूक आयोगाकडून अमित शहांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगांची तपासणी; व्हिडिओ शेअर करत गृहमंत्री म्हणाले..

Nov 15, 2024 06:16 PM IST

Amit Shah : हिंगोलीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अमित शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली तसेच त्यांच्या बॅगांचीही तपासणी केली.यावेळी भाजप सर्व नियमांचे पालन करत असल्याचेही अमित शाह यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.

अमित शहांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगांची तपासणी
अमित शहांच्या हेलिकॉप्टर अन् बॅगांची तपासणी

Maharashta Vidhan sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. राज्यातील व देश पातळीवरील बड्या नेत्यांच्या सभांचा राज्यभरात धडाका लागला आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडूनही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची वणी व औसा येथील हेलिपॅडवर बॅगांची तपासणी केल्यानंतर मोठं वादंग निर्माण झालं होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या हेलिकॉप्टर व बॅगांच्या तपासणीचे व्हिडीओ शूट करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्या बॅगा तपासून याचा व्हिडिओ पाठवण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती.

त्यानंतर आता हिंगोलीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अमित शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली तसेच त्यांच्या बॅगांचीही तपासणी केली.यावेळी भाजप सर्व नियमांचे पालन करत असल्याचेही अमित शाह यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे.

निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली होती. उद्धव ठाकरे वणी येथील हेलिपॅडवर दाखल होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाचे अधिकारी तेथे उपस्थित होते. त्यांनी ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची तसेच त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यावेळी ठाकरे म्हणाले की, बॅगा तपासा तसेच युरिन पॉटही तपासा.उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर बारामतीत अजित पवार यांच्या बॅगांची तर पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली होता. आज हिंगोली दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शहा यांची बॅग तपासण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शाह यांची बॅग तपासली.

या घटनेचा व्हिडिओ शेअर करत अमित शहा यांनी म्हटले की, आज हिंगोली विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि माननीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. आपण सर्वांनी निष्पक्ष निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

याआधी भाजप महाराष्ट्रने बुधवारी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले होते की, निवडणूक अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅगही विमानतळावर तपासली होती.केवळ दिखाव्यासाठी संविधानाचा आधार घेणे पुरेसे नाही, तर प्रत्येकाने घटनात्मक व्यवस्थेचेही पालन केले पाहिजे, काही नेत्यांना नाटक करण्याची सवय आहे, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला होता.

Whats_app_banner