मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dahi Handi : कोल्हापूरच्या राजकारणात इथून पुढं महाभारतच होणार; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

Dahi Handi : कोल्हापूरच्या राजकारणात इथून पुढं महाभारतच होणार; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 20, 2022 12:23 AM IST

Kolhapur politics : भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) यांनी सतेज पाटील (satej patil) यांना इशारा देत म्हटले की, जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात आता इथून पुढे महाभारतच होणार तसेच पुढच्या सर्व निवडणुकात भाजप व मित्रपक्षच विजयी होणार.

मुन्ना महाडिक व सतेज पाटील
मुन्ना महाडिक व सतेज पाटील

कोल्हापूर – दहीहंडीनिमित्त संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. दहीहंडीच्या माध्यामातून अनेक नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करून विरोधकांना एकप्रकारे इशारा दिला आहे. कोल्हापुरातील महाडिक गटाच्या दहीहंडीत भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) यांनी सतेज पाटील (satej patil) यांना इशारा देत म्हटले की, जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणात आता इथून पुढे महाभारतच होणार तसेच पुढच्या सर्व निवडणुकात भाजप व मित्रपक्षच विजयी होणार. 

धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) म्हणाले की, गेल्या काही दिवसात महाडिक गटाचे सलग पराभव झाले. विरोधकांनी खोट्या केसेस दाखल करून महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला. यामुळे येथून पुढे जिल्ह्याच्या राजकारणात महाभारतच होणार. तसेच,  कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदा अशा सर्व निवडणुकीत भाजप - शिंदे  गटाच्या  कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल, असे महाडिक यांनी सांगितले.

महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार होते. या काळात कोल्हापुरात सतेज पाटील यांनी चांगलं वर्चस्व मिळवलं होतं. सतेज पाटलांनी (satej patil) कोल्हापुरात गोकुळ दूध संघ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींपासून ते विधानसभा-खासदारकीच्या निवडणुकीत महाडिकांचा लागोपाठ पराभव केला. पण दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा अनपेक्षित विजय झाला आणि त्यांना राजकारणात नवसंजीवनी मिळाली. या विजयाने महाडिकांचा उत्साह वाढला आहे. विजयानंतर महाडिकांच्या समर्थकांनी कोल्हापुरात प्रचंड जल्लोष केला होता. महाडिकांसाठी तो क्षण अतिशय भावनिक असा क्षण होता. विजयानंतर महाडिकांना विरोधकांना इशारा दिला होता.

धनंजय महाडिक (Dhananjay mahadik) म्हणाले की, "आमचं ठरलंय” म्हणत लोकसभा निवडणुकीत माझा घात केला. गेल्या अडीच वर्षात मला व माझ्या कार्यकर्त्यांना प्रचंड त्रास दिला. आमच्यावर केसेस टाकल्या. अभिमन्यूला घेरल्यासारखं मला घेरलं होतं. पण मी बोललो होतो. सत्ता आमच्याकडे आली तर तुम्हाला झेपणार नाही. इथून पुढे महाभारत होणार. वाईटाचा नाश होणार आहे, प्रशासनावर दबाव आणून आमच्या कारखान्याचे सभासद रद्द केले. शिक्षण संस्था बंद पडण्याचा प्रयत्न केला. राजकारण हे एक चक्र आहे. आज आमचे दिवस आले आहेत. यापुढे वाईटांचे वाईट होईल, असे खा. महाडिक म्हणाले.

WhatsApp channel