महाविकास आघाडीत ठाकरे गट मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईतून सर्वाधिक जागा मिळणार आहेत. मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाकरेंची शिवसेना मुंबईत मोठा भाऊ असेल त्यावर आम्हाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. जे सत्य आहे ते आहे. मुंबईत कोण किती जागा लढवणार याबाबत काही चर्चाच झाली नाही. जागावाटप झाल्यावर याची माहिती दिली जाईल. त्यासोबत बदलापूर आणि इतर भागातील बलात्कार प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाली.
दरम्यान ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या ३६ पैकी २० जागांची मागणी केली आहे. ठाकरे गटाचा मुंबईत असलेले संघटन तसेच लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे २० जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीप्रमाणेच एका जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
वांद्रे येथील हॉटेल ट्रायडंट येथे महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने मुंबईतील ३६ पैकी २० जागांवर दावा सांगत शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ १६ जागा सोडण्याची तयारी दाखवलीय.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सर्वात जास्त जागांवर लढला होता. जर मुंबईबाबत बोलायचे तर शिवसेना मोठा भाऊच राहिल. मुंबईतील २० ते २२ जागांवर ठाकरे गटाने दावा केल्याचं सांगितलं जात आहे.अणुशक्तीनगरच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. २०१९ च्या निकालात भाजपने १६ तर शिवसेनेने १४ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी व समाजवादी पक्षानं प्रत्येकी एक जागा जिंकली होती. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ६ मतदारसंघापैकी ठाकरेंचे ३, काँग्रेस, शिवसेना व शिंदे गटाचा प्रत्येकी १खासदार निवडूनआला आहे.
तिन्ही पक्षांनी दावा सांगितलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघात विद्यमान आमदार नवाब मलिक अजित पवार गटात आहेत. शरद पवार गटाचे रविंद्र पवार येथून इच्छुक आहेत. वांद्रे पूर्व जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. त्याठिकाणी वरूण सरदेसाई इच्छुक आहेत. येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या संपर्कात असल्याचे समजते. वांद्रे पूर्वच्या बदल्यात चांदिवलीची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव आहे. चांदिवलीतून दिलीप लांडे विद्यमान आमदार असून ते शिंदे गटात आहेत. येथून काँग्रेसचे नसीम खान इच्छुक आहेत.
आव्हाड म्हणले, आजच्या बैठकीत फक्त राजकीय चर्चा झाली नाही तर बदलापूर घटनेवरून महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील यावर चर्चा झाली. शाळांच्या गेटवर पालकांची प्रचंड गर्दी होत आहे. बदलापूरच्या घटनेनं मुलं सुद्धा घाबरलेल्या अवस्थेत आहेत. बदलापूरचे कांड माणुसकीला काळीमा फासणारं असून यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.