- Shiv Sena Revolt: शिवसेनेतील बंडामुळं सरकारवर कुठलाही फरक पडणार नाही, असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
Maha Vikas Aghadi: शिवसेनेत झालेल्या बंडामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटात सापडलं आहे. बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिल्यामुळं आता तांत्रिक व कायदेशीर लढाई लढावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षही सज्ज झाले आहेत. ही आघाडी स्थापन करताना जी लीगल टीम कार्यरत होती, ती आता सरकार वाचवण्यासाठी कामाला लागली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राज्यातील राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते व मंत्र्यांची बैठक आज पार पडली. त्यानंतर काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सज्जतेची माहिती दिली.
'महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कार्यरत आहोत. सध्या घटनात्मक पेचावर कायद्याची लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी स्थापना करताना जी लीगल टिम कार्यरत होती, ती परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि लढाईसाठी सज्ज आहे. आम्ही या टीमशी सतत संपर्क ठेवून आहोत, असं थोरात यांनी सांगितलं.
‘सरकारचं काम कुठंही थांबलेलं नाही. आमचे सर्व मंत्री मंत्रालयात जात असून दैनंदिन कामकाज पाहत आहेत. जनतेची कुठलीही अडचण होणार नाही. राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नाही, राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही,’ असं ते म्हणाले. 'महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदार, मंत्र्यांबाबत काय करायचं याचा मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.
राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या चर्चेचं अशोक चव्हाण यांनी खंडन केलं. ‘अधिकृत पक्ष सोडून काही लोक गेल्यामुळं शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यातून आंदोलन होत आहे. ते स्वाभाविकही आहे. मात्र, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कुठंही निर्माण झालेली नाही, असं चव्हाण म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा गट स्वत:ला अधिकृत शिवसेना म्हणवून घेत असल्याबद्दल विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले, ‘कोणी कुणाच्या नावानं गट तयार केला तरी जोपर्यंत अधिकृतरित्या या गटाला आणि नावाला मान्यता मिळत नाही, तोवर याला काही अर्थ नाही.’