मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajan Salvi: विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना मैदानात; राजन साळवी यांना संधी
Rajan Salvi-Rahul Narvekar
Rajan Salvi-Rahul Narvekar

Rajan Salvi: विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेना मैदानात; राजन साळवी यांना संधी

02 July 2022, 12:51 ISTGanesh Pandurang Kadam

Rajan Salvi Vs Rahul Narvekar: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर होत असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत भाजपचे राहुल नार्वेकर यांच्याशी होणार आहे.

Vidhan Sabha Speaker Election: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे सरकारला सोमवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. तत्पूर्वी, उद्या, रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असून त्यासाठी महाविकास आघाडीनं राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे उमेदवार अॅड. राहुल नार्वेकर यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत धक्का देणाऱ्या भाजपनं विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवतानाही धक्का दिला. शिंदे गटाचे दीपक केसरकर किंवा भाजपच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याला ही संधी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र, तुलनेनं नवख्या असलेल्या राहुल नार्वेकर यांना भाजपनं उमेदवारी दिली. त्यामुळं भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर महाविकास आघाडीनं आज आपला उमेदवार जाहीर केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याचे आमदार राजन साळवी यांना महाविकास आघाडीनं संधी दिली आहे. एकामागोमाग एक आमदार शिवसेनेला सोडून जात असताना राजन साळवी हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले आहेत. २००९ पासून ते राजापूरमधून निवडून येत आहेत. त्यामुळंच शिवसेनेनं त्यांना संधी दिल्याचं बोललं जातं. काँग्रेस व राष्ट्रवादीनंही त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शवली आहे. साळवी यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला.

साळवी यांचा सामना अॅड. राहुल नार्वेकर यांच्याशी होणार आहे. नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. आदित्य ठाकरे यांचे ते विश्वासू मानले जात होते. नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. २०१९ च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या निवडणुकीत ते मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून निवडून आले. थेट विधानसभा अध्यक्ष ही त्यांच्यासाठी मोठी संधी मानली जात आहे.

‘विधानसभा अध्यक्षपदावर काँग्रेस पक्षाचा पहिला हक्क होता. मात्र, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले आणि विचारविनिमय करून शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झालं’, असं बाळासाहेब थोरात यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.