Dhruv Rathee News: लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीबद्दल एका पॅरोडी अकाऊंटवरून एक्स वर फेक मेसेज पोस्ट केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी लोकप्रिय यूट्यूबर ध्रुव राठी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बिर्ला यांची मुलगी संघ लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा न देता उत्तीर्ण झाली, असा दावा या पॅरोडी अकाऊंटवरून करण्यात आला. महाराष्ट्र सायबर विभागाने याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्राच्या सायबर क्राईम विभागाच्या म्हणण्यानुसार, ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिने परीक्षा न देताच लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे @dhruvrahtee नावाच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आले. या प्रकरणी बिर्ला यांच्या नातेवाईकाने भारतीय न्याय संहितेअंतर्गत बदनामी, अपमान आणि खोटे विधान केल्याप्रकरणी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे फेक मेसेज असून ध्रुव राठीचा याच्याशी काहीच संबंध नाही. पॅरोडी अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
या अकाऊंटच्या बायोमध्ये असे लिहिले होते की, हे एका चाहत्याने तयार केलेले पॅरोडी अकाऊंट आहे. ज्याचा ध्रुव राठीच्या अधिकृत खात्याशी संबंध नाही. शनिवारी पॅरोडी अकाऊंटवरून आणखी एक ट्विट करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, "महाराष्ट्र सायबर क्राईम पोलिसांच्या सूचनेनुसार, अंजली बिर्ला यांच्याबद्दल केलेल्या सर्व पोस्ट आणि टिप्पण्या काढून टाकण्यात आल्या आहेत. अंजली बिर्ला यांच्याबद्दल पोस्ट केल्याप्रकरणी मी माफी मागतो. मला वस्तुस्थितीची जाणीव नव्हती." मात्र, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ध्रुव राठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. व्लॉगर असण्यासोबतच ध्रुव सोशल मीडिया ॲक्टिव्हिस्ट देखील आहे. ध्रुव हा त्याच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर युट्युब व्हिडिओंसाठी ओळखला जातो. नुकतीच ध्रुवने त्याच्या इंस्टाग्रामवर एका पोस्ट केली होती. ज्यात त्याने लवकरच वडील होणार असल्याची बातमी दिली होती. या पोस्टमध्ये ध्रुवने तीन फोटो शेअर केले होते. त्यातील एका फोटोमध्ये तो स्वत: त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. इतर दोन फोटोमध्ये त्याची पत्नी बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. ध्रुव राठीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली.
संबंधित बातम्या