Maharashtra Assembly Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत कोकणातील दोन्ही जागा राखणाऱ्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत धक्के बसू लागले आहेत. तळकोकणातील माजी आमदार राजन तेली हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांचं पक्षांतर हा भारतीय जनता पक्ष, नारायण राणे व शिंदे सेनेच्या दीपक केसरकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यात अत्यंत वेगानं घडामोडी घडत आहेत. युती आणि आघाड्यांमुळं अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे. त्यामुळं त्यांनी संधी मिळेल त्या पक्षांची वाट धरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते राजन तेली हे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांना सावंतवाडी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे.
राजन तेली हे भाजपकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. हा मतदारसंघ भाजपनं घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, सध्या तिथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दीपक केसरकर हे आमदार आहेत. ही जागा भाजपला सुटणं अशक्य असल्यानं शेवटी तेली यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा पर्याय स्वीकारल्याचं बोललं जातं.
राजन तेली हे सध्या भाजपमध्ये आहेत. ते नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आहेत. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा तेली हे त्यांच्यासोबत होते. त्यानंतर प्रत्येक वेळी ते राणेंच्या सोबतच राहिले. मात्र, राणे यांच्या मुलांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून ते फारसे सक्रिय नव्हते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचे राणेंच्या मुलांशी खटके उडाले होते. तेव्हापासून ते संधीच्या शोधात होते.
राजन तेली यांच्या पक्षांतराच्या निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार व विद्यमान मंत्री दीपक केसरकर यांच्यापुढं आव्हान उभं राहिलं आहे. तेली हे सावंतवाडीमधील वजनदार नेते आहेत. ते माजी आमदार आहेत. अखंड शिवसेनेत असल्यापासून त्यांचा या भागात दरारा आहे. प्रसंगी त्यांनी राणेंशीही पंगा घेतला आहे. त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेची साथ मिळणार आहे. केसरकर हे शिंदे यांच्यासोबत गेल्यानं निष्ठावंत शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहे. या सगळ्याचा फटका त्यांना बसू शकतो.
तेली यांनी पक्षांतराचं कारणही सांगितलं. 'आम्ही शिवसेनेमुळंच नावारुपाला आलो. पण त्यावेळी नारायण राणे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना झाल्यामुळं त्यांच्यासोबत राहिलो. त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेलो ही त्यावेळी केलेली चूक होती. आज ही चूक दुरुस्त करणार आहे. नितेश राणे हे सातत्यानं आमच्यावर कुरघोडी करायचे, आम्हाला काम करू दिलं जात नव्हतं. जिल्ह्यातील घराणेशाहीमुळं आमची घुसमट होत होती. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला. भाजपवर आम्ही नाराज असण्याचं कारण नाही. त्या पक्षात आम्हाला प्रेम मिळालं. पण आमचा नाईलाज होता, अशा भावन तेली यांनी व्यक्त केल्या.
संबंधित बातम्या