शरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या, आमदार 'काका'विरुद्धच विधानसभेला ‘तुतारी’ फुकणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या, आमदार 'काका'विरुद्धच विधानसभेला ‘तुतारी’ फुकणार

शरद पवारांच्या गळाला आणखी एक पुतण्या, आमदार 'काका'विरुद्धच विधानसभेला ‘तुतारी’ फुकणार

Updated Sep 28, 2024 03:32 PM IST

Sharad Pawar : शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवारांच्या संपर्कात असून आता अजून एका पुतण्याने काकाविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे.

शरद पवार
शरद पवार

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होणार आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी शरद पवारांनी जोरदार पक्षबांधणी सुरू केली असून सोडून गेलेल्या आमदारांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. तानाजी सावंतच्या पुतण्यानंतर आता शरद पवारांच्या गळाला आणखी एक राजकीय पुतण्या लागला आहे. या पुतण्याने त्याच्या आमदार काकांविरोधातच विधानसभेसाठी दंड थोपटले असून राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याची तयारी सुरू केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधात पुतण्या धनराज शिंदे यांनी तयारी सुरू करत मतदारसंघात दौरे वाढवले आहेत.

शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवारांच्या संपर्कात असून आता अजून एका पुतण्याने काकाविरोधात बंडाचा झेंडा उभारला आहे. धनराज शिंदे यांनी माढा विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात आपल्या चुलत भावाच्या किंवा चुलत्याच्या विरोधात लढण्याचे संकेत दिले आहेत.

धनराज शिंदे यांनी मानेगाव येथे जाहीर सभा घेत निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणाऱ्या काळात रणजीत सिंह शिंदेंविरोधात धनराज शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे. शरद पवारांकडे आपण उमेदवारीची मागणी केली असून ते मला उमेदवारी देतील,असा विश्वास धनराज शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

माढ्यात चुलत भावांमध्ये होणार लढत -

माढा लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर माढा विधानसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव आगामी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपले पुत्र रणजिसिंह शिंदे यांना वारसदार म्हणून जाहीर करीत आगामी माढा विधानसभा निवडणुकीत त्यांनाच संधी देण्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे,त्यांच्या पुतण्यानेही मतदारसंघात दौरे वाढविल्याने शिंदे कुटुंबातच दोन चुलत भावांमध्ये लढत होण्याची शक्यता वर्तविली जाते.

विद्यमान आमदार बबनराव शिंदे (वय ७२) हे १९९५ पासून आतापर्यंत सलग सहावेळा माढ्यातून विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. साखर सम्राट म्हणून त्यांची मतदारसंघात ओळख आहे. सुरुवातीला विजयसिंह मोहिते-पाटील यांचे अनुयायी म्हणून काम केल्यानंतर ते राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू बनले. गेल्यावर्षीराष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून शरद पवारांचा पक्ष सोडला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या