Solapur Lok Sabha Election Result 2024 : राज्यातील ४८ जागांपैकी जवळपास सर्व जागांवरील चित्र स्पष्ट झाले असून सोलापूर मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या झालेल्या मुकाबल्यात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे (praniti shinde) यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा निसटता पराभव केला आहे. तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदार संघात शरद पवार यांची तुतारी वाजली असून धैर्यशिल मोहिते पाटील (dhairyashil mohite patil) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभूत केले आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूर मतदारसंघात (Solapur Lok Sabha constituency) गेल्या २ वेळेलाभाजपनं बाजी मारली होती. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने येथे विजय मिळवला होता. २०१९ मध्ये सुशील कुमार शिंदे यांना सोलापुरात पराभवाचा धक्का बसला होता. २०१४ मध्ये प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवत भाजपला हॅट्ट्रिकपासून रोखलं आहे.
सोलापुरात मतमोजणीच्या २४ फेऱ्या झाल्या असून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना ६०६२७८ मते मिळाली असून भाजपच्या राम सातपुते यांना ५२४६५७ इतकी मते मिळाली आहेत. प्रणिती शिंदे यांनी ८१ हजार ६२१ मताधिक्य घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला आहे.
सोलापुरात २०१९ मध्ये तिरंगी लढत झाली होती. वचिंत आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते पडली होती. मात्र याचा फटका काँग्रेस उमेदवाराला बसून येथे भाजप उमेदवाराने बाजी मारली होती. यावेळीही येथे तिरंगी लढत होती. मात्र वंचितमकडून उमेदवारी जाहीर झालेल्या राहुल गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यानंतर वंचितने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा जाहीर करत त्यांचा प्रचार सुरू केला. मात्र मतदारांनी वंचित फॅक्टरला नाकारले असल्याचे आजच्या निकालाने स्पष्ट झाले.
माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली. या अटीतटीच्या लढतीत धैर्यशिल मोहिते पाटील यांनी विजय मिळवला आहे. भाजपने माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना संधी दिल्याने अकलूजचे मोहिते पाटील कुटुंब नाराज होते. हीच नाराजी हेरत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना गळाला लावले अन् त्यांना रिंगणात उतरले.
निंबाळकरांसाठी देवेंद्र फडणवीसांनी अनेक सभा घेतल्या. पंतप्रधान मोदींच्याही अनेक सभा झाल्या. दुसरीकडेभाजपचेच नेतेउत्तम जानकर, तसेच फलटणचे निंबाळकर यांनीशरद पवारांच्या उमेदवाराला साथ दिल्याने त्यांची ताकद वाढली. व या लढतीत धैर्यशील मोहिते पाटलांनी सर्वांनाच धक्का देत विजय खेचून आणला.