मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  वाजवा रे वाजवा... आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मध्यरात्रीपर्यंत लाउडस्पीकर वाजवण्याची परवानगी

वाजवा रे वाजवा... आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात मध्यरात्रीपर्यंत लाउडस्पीकर वाजवण्याची परवानगी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 02:54 PM IST

Loudspeaker Permission : कोरोनाकाळात उत्सवांत गर्दी जमू नये, यासाठी राज्य सरकारनं लाउडस्पीकरवर बंदी घातली होती. त्यानंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

loudspeaker permission in maharashtra
loudspeaker permission in maharashtra (HT)

loudspeaker permission in maharashtra : कोरोना महामारीमुळं गेल्या तीन वर्षांपासून राज्यात मध्यरात्रीपर्यंत लाउडस्पीकर वाजवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध अखेर हटवण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. त्यामुळं आता आजपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर अथवा डिजे वाजवण्यासाठी सरकारनं परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं आता ऐन नवरात्रीच्या काळात भक्तांना मध्यरात्रीपर्यंत डिजेच्या तालावर ठेका धरता येणार आहे.

कोरोनाकाळात राज्यात लाउडस्पीकर वाजवण्यावर निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांनंतर यावेळी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. त्यावेळीही लाउडस्पीकर वाजवण्याला रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. परंतु आता ही संपूर्ण महाराष्ट्रात लाउडस्पीकर वाजवण्याला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं आता नवरात्रीसह आगामी काळात येणाऱ्या सणोत्सवांच्या काळात लाउडस्पीकरला मध्यरात्री १२ पर्यंत परवानगी मिळणार आहे.

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरसह अनेक शहरांमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालत असतात. त्यामुळं आता आगामी सणोत्सवांच्या काळात निर्बंधमुक्त आणि नियममुक्त डिजे वाजवता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उशिरा लाउडस्पीकर वाजवण्यावरून राजकीय वादंग पेटलं होतं. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं होतं. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं मध्यरात्रीपर्यंत लाउडस्पीकर वाजवण्याला परवानगी दिल्यानं तरुणाई मध्यरात्रीपर्यंत झिंगाटवर झिंगताना पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point