Mhada lottery : मुंबई, पुण्यात स्वत: आणि बजेट मधले घर घ्यायचे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडा राज्यभरात सुमारे ७ हजार ५०० घरांची सोडत लवकरच काढली जाणार आहे. ही लॉटरी मुंबईसह कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील घरांसाठी काढली जाणार आहे. या साठी या महिन्यातच सोडतीची तारीख म्हाडातर्फे जाहिर केली जाणार आहे.
राज्यात म्हाडातर्फे नागरिकांना स्वस्त आणि माफक दरात घरे दिली जातात. मुंबई आणि पुण्यात महागडी घरे ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. दरवर्षी या लॉटरीसाठी मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक अर्ज करत असतात. दरम्यान, म्हाडाच्या प्रत्येक मंडळाची वर्षातून किमान एक तरी लॉटरी काढण्यात येईल अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली होती. त्यानुसार आचारसंहिता संपताच आता म्हाडा विविध शहरातील लॉटरी काढण्याची तयारी करत आहेत.
ही लॉटरी मुंबईतील १९०० हजार घरांसाठी काढली जाणार आहे. यासाठीची जाहिरात ही २२ जुलैपर्यंत काढली जाण्याची शक्यता आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना महिनाभर मुदत दिली जाणार आहे. गणेशोत्सवापूर्वी ही सोडत संगणकाच्या माध्यमाने काढली जाणार आहे, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर मुंबई सोबतच पुणे, कोकण, संभाजीनगर येथील ५ हजार ६०० घरांच्या विक्रीसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे.
नव्या लॉटरीत मुंबईत १९०० हजार घरे, तर कोकणात १६००, पुण्यात २५०० तर, छत्रपती संभाजीनगर येथील १५०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी देखील म्हाडाने लॉटरीची सोडत काढली होती. तब्बल पाच हजार घरांची सोडत काढण्यात आली होती. यात पुण्यातील आणि मुंबईतील अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांनी या सोडतीसाठी अर्ज केले होते. या सोडतीची लॉटरी गेल्या वर्षी जाहिर झाली होती. आता पुन्हा नव्याने ही सोडत काढण्यात येणार असल्याने आता नागरिकांना पुन्हा महानगरात स्वस्त दरात घर घेण्याची संधि मिळणार आहे.