Ajit Pawar On Sanjay Gaikwad : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. त्यामुळं अनेक सरकारी कार्यालयं ओस पडली असून प्रशासकीय कामकाज खोळंबलं आहे. त्यानंतर आता विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या संपावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. संपकरी कर्मचाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी चांगलंच सुनावलं आहे. सत्ताधारी आमदारच नाउमेद झाले तर राज्य कसं चालणार?, असा सवाल करत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात कर्मचारी संपावर असताना सत्ताधारी पक्षाचा आमदारांनी वादग्रस्त वक्तव्ये न करता समंजस भूमिका घ्यायला हवी. सत्ताधारी आमदारच सरकारी कर्मचाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्ये कसे काय करू शकतात?, आपल्याला कर्मचाऱ्यांकडून कामं करून घ्यायची आहेत. सत्ताधारी आमदारच नाउमेद झाले तर राज्य कसे चालणार?, पंचनामे कसे होणार?, नुकसानग्रस्त भागांमध्ये मदत कशी काय होणार?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार संजय गायकवाड यांना सुनावलं आहे.
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. दुसरीकडे राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत. असा दुहेरी कात्रीत महाराष्ट्र सापडलेला आहे. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करायला कर्मचारी नाहीत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारनं या आंदोलनावर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.