lonikand crime : पुण्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. एका तरुणीला नोकरी देण्याच्या आमिषाने तिला पुण्यात बोलावून तिच्या नाश्त्यात गुंगीचे औषध मिसळून बलात्कार करण्यात आला. यातून तरुणी गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार इब्राहिम शेख, रोशनबी, परवीन शेख, मंगला आणि मंगलाची मुलगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी ही श्रीरामपूर येथील असून हा प्रकार श्रीरामपुर येथील रमानगर शुभम मंगल कार्यालयाच्या पाठीमागे खांदेवनगर कल्पना हॉस्पिटल येथे २०१५, २१ सप्टेबर २०२२ आणि ३ सप्टेबर रोजी घडला.
या घटनेची माहिती अशी की पीडित तरुणीला काम हवे होते. या साठी ती आरोपींकडे गेली. आरोपींनी पीडित मुलीला पुण्यात बोलवले. या ठिकाणी तिच्या असाह्यतेचा फायदा घेत त्यांनी तिच्या नाश्त्यात गुंगीचे औषध मिसळले. या ठिकाणी ती बेशुद्ध झाली असता आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर देखील पीडितेला वारंवार धमकी देऊन तिच्यावर विविध ठिकाणी बलात्कार करण्यात आला.
दरम्यान, या प्रकारातून तरुणी गर्भवती राहिल्यावर चंदननगर येथील हॉस्पिटलमध्ये तिचा जबरदस्तीने गर्भपात देखील करण्यात आला. यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. पीडित मुलीचा गळा आवळून हाताने मारहाण देखील केली. ऐवढेच नाही तर तिच्याशी पुन्हा अनैसर्गिक शारीरिक संबंध देखील ठेवले. अखेर या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करीत आहेत. पुण्यात मुली व महिलांवर अत्याचार वाढले आहे. रोज अशा घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे पुणे शहर महिलांसाठी असुरक्षित बनले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत.