Lonavla news : पर्यटकांची पंढरी असलेल्या लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. या डॅमच्या ठिकाणी आज रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली असून शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती.
पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोणावळ्यातील घाट परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. शनिवार आणि रविवार जोरदार पाऊस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. येथील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धारणांच्या पायऱ्यावर हजारो पर्यटकांनी पाण्याचा आनंद लुटला. विकेंड असल्याने मोठ्या संख्येने मुंबईतुन पर्यटक लोणावळ्यात आले असून त्यांनी भुशी धरणावर गर्दी केली होती.
लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण परिसरात आज मोठी गर्दी झाली होती. पुणे व मुंबईसह राज्यातील विविध भागांतून पर्यटक भुशी धरणात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. लोणावळ्यात सतत पाऊस कोसळत असल्यामुळे अखेर भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाले आहे. भुशी डॅमसह लायन्स पॉईंट टायगर पॉईंट येथीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.
शनिवार आणि रविवार विकेंडमुळे लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. मोठ्या प्रमाणात वाहने आल्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवतांना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
पुण्यात सध्या घाट विभागात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाणी ताम्हीणी घाट असून या घाटात पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. शनिवारी आणि रविवारी या घाटात पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, हा घाट अपघात प्रवण असल्याने आणि गेल्या काही दिवसांत दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याने खबरडारीचा उपाय म्हणून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत हा घाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.